या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अब्दुल सोहेल अब्दुल शफीक असे आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी मोहम्मद मुस्तकीन मोहम्मद मुमताज याला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
नेमका काय घडला प्रकार?
पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, २० ऑक्टोबर रोजी रात्री अब्दुल सोहेल हा फटाके फोडत होता. याच वेळी त्याने आपल्या दिशेने फटाका फेकला आणि तो फोडला, असा समज आरोपी मोहम्मद मुस्तकीनला झाला. या क्षुल्लक गैरसमजातून दोघांमध्ये पहिल्यांदा वाद झाला होता.
advertisement
२१ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा मोहम्मद मुस्तकीन हा अब्दुल सोहेलच्या घराकडे गुलिस्तानगरस्थित अल बड़झर हॉल परिसरात आला. तिथे पुन्हा एकदा याच जुन्या कारणावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर याचं रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी, संतापलेल्या मुस्तकीनने अब्दुल सोहेलवर थेट चाकूने वार केले. मुस्तकीनने केलेला एक वार सोहेलच्या खांद्याजवळ लागला. चाकूचा वार वर्मी लागल्याने अब्दुल सोहेल घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने सोहेलचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे गुलिस्तानगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. क्षुल्लक वादातून तरुण मुलाचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नागपुरी गेट पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
