अमरावती - जर पूर्वज सुखी असतील तर संपूर्ण कुटुंब संपत्ती, समृद्धी आणि सुखात न्हाऊन निघते, असे म्हटले जाते. त्यामुळेच देवी-देवतांच्या पूजेबरोबरच पितृपक्षात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी लोक श्राद्ध करतात. हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे.
यावर्षीचा पितृपक्ष हा 18 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. पितृपक्षाच्या काळात अनेक महत्त्वाच्या तिथी आहेत. प्रत्येक तिथी ही राखीव आहे. या सर्व तिथीमधील 1 तिथी म्हणजे येत्या 1 ऑक्टोबरला असणारे चतुर्दशी श्राद्ध ही तिथी आहे. ही तिथी कोणासाठी राखीव आहे? या तिथीला काय केले जाते? हे जाणून घेऊयात.
advertisement
ज्योतिषी प्रफुल येलकर यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पितृपक्षातील चतुर्दशी श्राद्ध ही तिथी अनैसर्गिकरित्या म्हणजेच, अपघाती, सर्पदंश, आत्महत्या या प्रकाराने मृत्यू पावलेल्या लोकांसाठी राखीव आहे. अपघाती मृत्यू पावलेल्या लोकांच्या श्राद्धविधी या दिवशी केल्यास आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळते. त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. या तिथीला श्राद्धविधीबरोबरच अन्नदान सुद्धा करू शकता.
Astrology: सर्वपित्री अमावस्येवर ग्रहणाचं सावट, या दिवशी श्राद्ध करावं की नाही? पितृपक्ष संपतोय...
त्याचबरोबर या वर्षीच्या पितृपक्षाचे विशेष म्हणजे पितृपक्षाच्या सुरवातीला चंद्रग्रहण तर समाप्तीला सूर्यग्रहण आहे. त्यामुळे हा काळ कालसर्पदोषामध्ये येतो, असे पंचांगमध्ये सांगितले आहे. त्यामुळे याकाळात कालसर्पदोषाची पूजाविधी केली असता या दोषाचे निवारण होते, असेही ज्योतिषी प्रफुल येलकर यांनी सांगितले.
पितृपक्षाचे 15 दिवस हे पितरांना समर्पित असतात. या 15 दिवसांमध्ये पूर्वज पूर्वज जगातून पृथ्वीवर येतात, असे मानले जाते. अशा स्थितीत पितरांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी श्राद्ध, पिंडदान इत्यादी करण्याची परंपरा आहे, असे केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो.
सूचना - ही माहिती ज्योतिषांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. तसेच याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.