अमरावती - विदर्भातील उकडपेंडी या पदार्थाचे नाव जरी ऐकले तरी तोंडाला पाणी सुटेल असा हा पदार्थ आहे. त्यातली विदर्भ स्टाईल ही गोष्टच निराळी आहे. उकडपेंडी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. काहीजण रवा आणि पिठाची बनवतात तर काहीजण फक्त गव्हाच्या पिठाची बनवतात. पण खरे तर उकडपेंडी ही ज्वारीच्या पिठाची बनवली जाते. विदर्भाच्या शैलीची ज्वारी आणि गव्हाच्या पिठापासून ही उकड पेंडी नेमकी कशी तयार केली जाते, हे आपण जाणून घेऊयात.
advertisement
साहित्य :- 1 छोटी वाटी गव्हाचे पीठ जाड असलेले, 1 वाटी ज्वारीचे पीठ, ज्वारीचे पीठ जास्त घ्यायचे, तेल, कडीपत्ता, जिरे, मोहरी, कोथिंबीर, हळद, मीठ, तिखट, शेंगदाणे, हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा हे साहित्य लागतात. यात तुम्ही ताक आणि दही सुद्धा घेऊ शकता.
कृती :- सर्वात आधी गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात कांदा घालावे. कांदा लाल होत पर्यंत परतून घ्यायचा. नंतर मिरची आणि कडीपत्ता टाकायचा. ते परतून घ्यायचे. नंतर त्यात जिरे आणि मोहरी घालावे. मिरची शिजल्यानंतर त्यात शेंगदाणे घालायचे. आता तिखट, मीठ, हळद घालावे. ते 2 मिन शिजू द्यावे. आता त्यात गव्हाचे आणि ज्वारीचे पिठ घाला. गव्हाचे पीठ हे जाडसर असल्यास उकडपेंडी आणखी छान होते. नंतर ते पिठ भाजून घ्यावे.
पिठ जेवढे चांगले भाजले जाईल. तेवढी उकड पेंडी टेस्टी बनते. पिठ चांगल्याप्रकारे शिजल्यानंतर त्यात पाणी घालावे. तुम्ही इथे गरम पाणी सुद्धा वापरू शकता. पाणी घालतांना थोडे थोडे घालायचे आहे. तुम्ही यात आंबटपणासाठी ताक किंवा दही सुद्धा वापरू शकता. ते व्यवस्थित शिजून घ्यावे. पाणी घालून मिक्स केल्यानंतर काही वेळ वाफ येऊ द्यायची आहे. त्यानंतर उकडपेंडी खाण्यासाठी तयार होते. बारीक चिरलेला कांदा आणि ज्वारीच्या पिठाचे पापड यासोबत खाण्यासाठी खूप टेस्टी लागते.