ऑटोरिक्षा चालक असलेल्या नफीस अन्सारी यांनी मुंब्रामधील वॉर्ड क्रमांक 30 मधून निवडणूक जिंकली, जो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. 'वॉर्डमधील सर्व नागरिकांसाठी नगरसेवक म्हणून काम करू, जरी त्यांनी मला मत दिलं असो किंवा नसो', अशी प्रतिक्रिया नफीस अन्सारी यांनी या विजयानंतर दिली आहे.
'वॉर्डमध्ये रिक्षा चालवत असताना चुकीची कामं दिसायची. नागरिकांना रोज समस्यांचा सामना करावा लागत होता. या समस्या सोडवण्यासाठी मी काय करू शकतो? हे मी लोकांना समजवून सांगायचो. मी आधीपासूनच प्रचार सुरू केला होता. एमआयएमने मला दिलेल्या संधीचं मी सोनं केलं', असं नफीस अन्सारी म्हणाले आहेत. निवडणुकीच्या काळात नफीस अन्सारी यांनी त्यांच्या रिक्षेमधून फिरूनच प्रचार केला होता.
advertisement
रिक्षाचालक असलेले नफीस अन्सारी हे अत्यंत सामान्य कुटुंबातून येतात. मागच्या निवडणुकीमध्ये अन्सारी यांना जिंकण्यात यश आलं नाही, पण त्यानंतरही ते खचून गेले नाहीत. आता निवडणूक जिंकल्यानंतर फेरीवाल्यांविरुद्ध लढणे, स्वच्छ पाणी आणि राखीव भूखंड मुक्त करणे, हे आपलं प्राधान्य असेल, असं नफीस अन्सारी म्हणाले आहेत.
ठाणे महापालिकेचा निकाल
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 75 जागा, भाजपला 28, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 12 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला 9 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांचा मुंब्रा हा बालेकिल्ला मानला जातो. जितेंद्र आव्हाड मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा आमदार आहेत. आव्हाडांनी महाराष्ट्रात वेगवेगळी मंत्रिपदंही भूषावली आहेत, पण आव्हाडांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे.
