पुणे : नाशिकमधील स्वयंघोषित 'कॅप्टन' अशोक खरात याच्या पाशवी कृत्यांचा पाढा वाचला जात असतानाच, आता या प्रकरणाला एक अतिशय गंभीर वळण मिळाले आहे. अनेक मंत्री आणि बड्या राजकारण्यांचे खरातशी असलेले संबंध उघड होऊ नयेत, यासाठी येत्या 24 मार्च रोजी अशोक खरातचा पोलीस एन्काऊंटर केला जाऊ शकतो, असा खळबळजनक दावा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, पीडितांच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
भोंदू अशोक खरातचे सर्वपक्षिय नेत्यांशी जवळीक असल्याचं आता लपून राहिलं नाही. सोशल मीडियावर विविध नेत्यांसोबतचे त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. खरातनं नेत्यांशी असलेल्या जवळीकीचा फायदा घेत हे उद्योग केले होते. तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, अशोक खरातकडे अनेक वजनदार नेत्यांची अत्यंत गोपनीय आणि वादग्रस्त माहिती असू शकते. जर खरातने तोंड उघडले, तर राज्यातील अनेक प्रस्थापित नेत्यांची कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. हे टाळण्यासाठी 'काटा काढण्याचा' प्रयत्न केला जात असल्याची शंका काही पीडितांनी व्यक्त केली आहे. 24 मार्च ही तारीख महत्त्वाची असून, याच दिवशी खरातला संपवण्याचा कट रचला जात असल्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी हा डाव वेळीच ओळखून तो उधळून लावावा.
चाकणकरांची पक्षातून हकालपट्टी करा, तृप्ती देसाईंची मागणी
अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना आधीच आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र, तृप्ती देसाई यांनी आता थेट उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. केवळ राजीनामा पुरेसा नाही तर सुनेत्रा वहिनींनी रूपाली चाकणकर यांची पक्षातूनच हकालपट्टी करणे गरजेचे आहे, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.
खरातसोबतचे फोटो आणि पाद्यपूजेचे व्हिडीओ समोर
चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो आणि पाद्यपूजेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी करत आहे. खरातच्या लॅपटॉपमध्ये 100 हून अधिक अश्लील व्हिडिओ सापडल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. अशातच तृप्ती देसाईंच्या एन्काऊंटर च्या दाव्याने पोलिसांवरील दबाव वाढला आहे. अशोक खरात प्रकरण फक्त गुन्हेगारी तपासापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तर आता त्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झालेत. आता एसआयटीच्या पुढील चौकशीत कोणती माहिती समोर येते, त्यावरून राजकारणाला दिशा मिळेल.
