मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी इथं घडली आहे. गणेश डोंगरे असं या शेतमजूर तरुणाचं नाव आहे. गणेश डोंगरे हा एक रिलस्टार सुद्धा होता. तो आणि त्याची पत्नी अश्विनी हे दोघे रिलच्या माध्यमातून ऊसतोड मजुराचं कसं आयुष्य असतं हे दाखवत होते.
advertisement
दोन दिवसांपूर्वी नेहमीसारखे गणेश डोंगरे आणि त्याची पत्नी अश्विनी हे लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यावर ऊस सोडण्यासाठी गेले होते. साखर कारखान्यात वजन काट्याजवळ ऊस मोजण्यासाठी बरीच गर्दी होती. त्यामुळे आपला नंबर येण्यासाठी गणेश डोंगरे आणि त्याचे साथीदार वाट पाहत होते. यावेळी अश्विनी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ लाईव्ह केला. यामध्ये अश्विनी दाखवतेय की, ड्रायव्हर लोकांनी गाड्या उभ्या केल्या आहे, काही लोक इथं बनवून खात आहे. कारखान्यावर गाडी लवकर खाली होत नाही, त्यामुळे इथंच थांबवं लागतंय. जर गाडी नसेल तर ५०० रुपये दंड लागतो. आमची तर ऊसाची बैलगाडी आहे. असं सांगत होती, तितक्यात ज्या ठिकाणी गणेश बसला होता, तिथे उसाची ट्रॉली उलटली आणि अश्विनी तसं बायो म्हणत किंचाळली अन् धावत गेली.
अवघ्या २ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये गणेश डोंगरे हा डोळ्यासमोर बसलेला होता. पण, काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. डोळ्यादेखत गणेश डोंगरे यांचा अंगावर ट्रॅक्टर ट्रॉली कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. यामुळे डोंगरे कुटुंब उघड्यावर आलं आहे. गणेश डोंगरे याला तीन लहान मुलं आहे. या कुटुंबाला कारखान्याने मदत करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान अश्विनी आणि गणेश डोंगरे हे वेगवेगळ्या रिल्स च्या माध्यमातून सोशल मीडियावर देखील लोकप्रिय होते. रिलस्टारचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने त्याच्या चाहत्या मधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
धनंजय मुंडे यांच्याकडून मदतीची घोषणा
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी गणेश डोंगरे याच्या मृत्युमुळे तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. " वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील रहिवासी असलेल्या अत्यंत सामान्य ऊसतोड कुटुंबातील ऊसतोड कामगार गणेश डोंगरे यांचा धाराशिव जिल्ह्यातील एका साखर कारखान्यात घडलेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. परिस्थितीने अत्यंत गरीब पण स्वाभिमानाने ऊसतोडणी करून आपल्या कुटुंबीयांचे निर्वहण करणाऱ्या आमच्या या बांधवाच्या अकाली निधनानंतर त्याचे मुले - बाळे ECf कुटुंब उघड्यावर पडणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ' अशी घोषणा धनंजय मुंडेंनी केली.
तसंच. "राज्य शासनाने लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण व पुनर्वसन करण्याची लेखी मागणी शासनाकडे करणार आहे. ऊसतोड कामगारांचे नेहमी घडणारे अपघात तसंच त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक संरक्षण आणि स्थैर्य याबाबत राज्याचा सामाजिक न्याय विभागाचा मंत्री असताना मी प्रस्तावीत केलेल्या योजना पूर्णत्वास नेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे, असंही यावेळी धनंजय मुंडेंनी सांगितलं.
