पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामखेड–बीड रोडवर असलेल्या न्यू कावरी हॉटेलमध्ये १८ डिसेंबर रोजी ही घटना घडली. या हल्ल्यात हॉटेल मालक रोहित अनिल पवार जखमी झाले आहे. ही घटना रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रोहित अनिल पवार यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी संगनमताने हॉटेलमध्ये घुसून पिस्तूल, सुरा आणि लाकडी दांड्यांच्या साहाय्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात फिर्यादीस गंभीर दुखापत झाली असून हॉटेलमधील साहित्याचंही नुकसान झाले आहे.
advertisement
हॉटेलमध्ये काय घडलं?
दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी न्यू कावरी हॉटेलचे मालक रोहित पवार हे बाहेर उभे होते. त्यावेळी एक स्विफ्ट गाडी आली. त्यातून ५ इसम उतरले त्यातील ३ जणांकडे गावठी कट्टा होता. त्यांनी रोहित पवार यांच्याकडे गोळीबार सुरू केला. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी रोहित पवार हे पळाले आणि लपून बसले. त्यानंतर काही तरुण तिथे आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली. तसंच रोहित पवार यांच्या गाडीचीही तोडफोड केली आहे. जखमी अवस्थेत रोहित पवार यांना साईदिप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. या प्रकरणीत रोहित पवार यांचा जबाब नोंदवला असून त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.
जुन्या वादातून हल्ला
रोहित पवार आणि काही इसमामध्ये नोव्हेंबर महिन्यात वाद झाला होता. त्यानंतर हा हल्ला झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
न्यू कावरी हॉटेलमध्ये जुन्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शुभम शहाणराम लोखंडे, उल्हास विलास माने, अक्षय उर्फ चिंगा मोरे, अक्षय अमीन सय्यद यांच्यासह इतर इसमांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हास माने याला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
