नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय तक्रारदार तरुणी नायगाव पूर्वेकडील रहिवासी आहे. मंगळवारी १४ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता ती नायगाव रेल्वे स्थानकात उतरली होती. ती रस्त्याने आपल्या घराकडे पायी निघाली होती. तिवरी फाटक ते काजूपाडा रस्त्यावरून ती चालत असताना, अचानक एका अनोळखी तरुणाने तिला मागून पकडले. आरोपीने तिचे तोंड दाबून तिला जवळच्या झुडपात ओढत नेले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने अत्यंत धाडसाने प्रतिकार करत कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि जीव वाचवण्यासाठी पळ काढला.
advertisement
या गंभीर घटनेनंतर पीडित तरुणीने नायगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपीला अटक
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखाच्या पथकाने तत्काळ समांतर तपास सुरू केला. परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. या तपासानंतर पोलिसांनी राणू सिंग (वय २५) या तरुणाला अटक केली. राणू सिंग हा मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राणू सिंग हा विकृत मनोवृत्तीचा असून, तो गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावर पाळत ठेवून होता. पीडित तरुणीची देहयष्टी किरकोळ असल्याने त्याने तिला लक्ष्य केले. तिला मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण तरुणीने धाडस दाखवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने याआधी अशाप्रकारे कुणावर अत्याचार केला आहे ? याचा तपास सुरू आहे.
