पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आझम पानसरे यांचे सुपुत्र निहाल पानसरे यांनी अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पानसरे यांचा शहरात मोठा जनाधार असून विशेषतः अल्पसंख्याक समाजात त्यांचा दबदबा आहे. त्यांच्या प्रवेशाने महानगरपालिकेची काही प्रभागाची समीकरणे बदलल्याची चर्चा आहे. बऱ्याच प्रभागात पानसरे यांचा थेट प्रभाव असल्याने राष्ट्रवादीला मोठा फायदा होणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.
advertisement
निहाल पानसरे यांच्या प्रवेशावर अजित पवार काय म्हणाले?
पिंपरी-चिंचवड शहरात जनसेवेमध्ये कार्यरत असणारे निहाल आझम पानसरे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. युवा कार्यकर्ते आणि अनुभवी पदाधिकारी जोडले जात असल्यामुळे पक्षाला नक्कीच बळकटी मिळणार आहे, असे अजित पवार म्हणाले.
महत्त्वाचे म्हणजे स्थानिक पातळीवर सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या, प्रश्न आणि अडचणींचे निराकरण करणे नवीन सहकाऱ्यांच्या माध्यमातून सोपे होणार आहे, असेही अजित पवार म्हणाले.
तसेच आज पुण्यात माजी सभापती, जि.प. माजी सदस्य, सरपंच, उपसरपंच अशा अनेक युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले. नवी ऊर्जा, नवी दृष्टी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरी ताकद आहे. युवकांच्या सहभागामुळे पक्ष अधिक सक्षम होईल आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याची ताकद आणखी वाढेल, असेही अजित पवार म्हणाले.
