वाढदिवसाच्या सोहळ्यात राजकीय 'बॉम्ब'
बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त जालना जिल्ह्यातील वाटूर येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लोणीकर यांची लाडू तुला करण्यात आली. या सोहळ्यात बोलताना लोणीकरांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे आणि उत्तराधिकाराचे स्पष्ट संकेत दिले. ते म्हणाले की, मी आता थकलो नाही, परंतु तरुणांना संधी मिळणे आवश्यक आहे. माझे चिरंजीव आता निवडणुकीसाठी सज्ज असून ते 'वेटिंग'वर आहेत, त्यामुळे मी विधानसभा लढवणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
लोकसभेसाठी इच्छा व्यक्त
विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचे संकेत दिले असले, तरी लोणीकर यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेणार नसल्याचेही स्पष्ट केले. "जर पक्षाने संधी दिली, तर मी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे," अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे लोणीकर आता राज्याच्या राजकारणातून केंद्राच्या राजकारणात जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
परतूर विधानसभा मतदारसंघात लोणीकर यांची मोठी पकड आहे. मात्र, आता त्यांनी स्वतःहून मुलासाठी जागा मोकळी करण्याचा निर्णय घेतल्याने मतदारसंघात नव्या नेतृत्वाचा उदय होण्याची शक्यता आहे. लोणीकरांच्या या विधानामुळे येणाऱ्या काळात जालन्याच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात. तर, दुसरीकडे लोणीकर यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या मुलाची उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
