कडक पोलीस बंदोबस्तात, हाताला दोरखंड बांधलेल्या अवस्थेत बंडू आंदेकरला निवडणूक कार्यालयात आणण्यात आलं होतं. तोंडावर काळे कापड बांधलेलं असतानाही, कार्यालयात प्रवेश करताना त्याने 'व्हिक्टरी' खूण दाखवत आपला इरादा स्पष्ट केला. आंदेकर कुटुंबातील बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर हे प्रभाग क्रमांक २२, २३ व २४ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
advertisement
'मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही'
न्यायालयाने बंडू आंदेकरला अर्ज भरताना मिरवणूक काढण्यास, भाषण करण्यास किंवा घोषणाबाजी करण्यास सक्त मनाई केली होती. मात्र, कार्यालयात शिरताना आंदेकरने 'नेकी का काम, आंदेकर का नाम' आणि 'वनराज आंदेकर जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या. "मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही" असंही तो म्हणाला. यामुळे पोलिसांच्या सूचनेला आंदेकरने हरताळ फासल्याचं दिसून आलं.
वकिलांची चूक की जाणीवपूर्वक खेळी?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडू आंदेकरसह तिन्ही सदस्य क्षेत्रीय कार्यालयात पोहोचेपर्यंत त्यांच्या वकिलांनी अर्ज पूर्ण भरले नव्हते. इतकेच नाही तर अर्जावर उमेदवारांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या नव्हत्या. कार्यालयात गेल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली, मात्र वेळेत अर्ज पूर्ण न झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी ते स्वीकारले नाहीत.
पोलिसांची डोकेदुखी वाढली
बंडू आंदेकर कारागृहातून बाहेर येण्यासाठी किंवा शहरात आपले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी ही 'चाल' खेळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता अर्ज स्वीकारले न गेल्याने, या तिघांनाही पुन्हा एकदा अर्ज भरण्यासाठी कार्यालयात यावे लागणार आहे. परिणामी, पोलिसांना पुन्हा एकदा तितकाच कडक बंदोबस्त आणि मनुष्यबळ तैनात करावं लागणार आहे. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
