निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना तावरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याने माळेगावात तणावाचे वातावरण आहे. नितीन तावरे यांच्या हल्ल्याची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेऊन विरोधकांवर निशाणा साधला. लोकशाही प्रक्रियेत निवडणूक लढविणे हा नागरिकांचा अधिकार आहे. या अधिकारावरच आक्रमण करुन नागरिकांचा आणि विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रकार अतिशय संतापजनक असल्याचे त्या म्हणाल्या.
advertisement
कसा निवडणूक लढवतो तेच पाहतो म्हणत मारहाण, जयदीप तावरे यांच्यावर गंभीर आरोप
नितीन तावरे म्हणाले, "मी आज सायंकाळी माळेगावात पत्रकार परिषद घेतली. जे अपक्ष होते, जे नाराज झाले होते, त्यांना एकत्र करून त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शरद पवार पक्षाच्या पॅनेलची घोषणा केली. मी स्वत:ही उमेदवार आहे, १५ नंबर प्रभागातून मी निवडणूक लढवतो आहे. मागेही माझ्यावर अशाच प्रकारचा प्राणघातक हल्ला झाला होता. त्यावेळीही जयदीप तावरे यांनीच पाळत ठेवून माझ्यावर हल्ला केला होता. रविराज तावरे यांच्याबरोबर मी कायम असतो, हीच बाब त्यांना खटकत असे. जयदीप तावरे यांचे मेहुणे, त्याच्या मामाची मुले आणि सोरणकर म्हणून एक जण होता. त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांच्या हातात चाकू होता. माझ्यासमोर आल्यानंतर त्यांनी मला शिव्या दिल्या. पॅनेल उभा करतोस काय? कसा निवडणूक लढवतो तेच पाहतो, असे म्हणत मला गंभीर मारहाण केली. अनेक माणसांनी बघ्याची भूमिका घेतली. मध्यस्थीसाठी कुणीही पुढे आले नाही. त्यांनी चाकूने वार करायचा प्रयत्न केला, पण मी बचाव करण्यात यशस्वी झाल्याने माझ्यावरील वार टाळता आला"
निवडणूक लढवित असल्याचा राग मनात ठेवून हल्ला, सुप्रिया सुळे यांचेा गंभीर आरोप
बारामती तालुक्यातील माळेगाव बु. नगरपंचायतीची निवडणूक लढवित असल्याचा राग मनात धरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला. लोकशाही प्रक्रियेत निवडणूक लढविणे हा नागरिकांचा अधिकार आहे. या अधिकारावरच आक्रमण करुन नागरिकांचा आणि विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे. आम्ही सर्वजण या भ्याड हल्ल्ल्याचा निषेध करतो. माझी शासनाला विनंती आहे की कृपया हा हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी. नीतीन तावरे हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना, असे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
