दरम्यान या सभेसाठी जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. या सभेला अजित पवार गटाचे सर्वच मंत्री उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार यांचा हा पहिलाच बीड दौरा आहे. या सभेचं सर्व नियोजन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी तब्बल 40 फुटांचे बॅनर फ्लेक्स लावण्यात आले आहेत. सभेपूर्वी राष्ट्रवादीच्या वतीनं भव्य अशी रॅली देखील काढण्यात येणार आहे.
advertisement
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिला दौरा
दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केलं. त्यांनी भाजप, शिवसेनेला पाठिंबा देत आपल्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांमध्ये धनंजय मुंडे याचा देखील समावेश आहे. आज धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांची सभा होत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच बीडमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील सभा झाली होती. या सभेनंतर अजित पवार यांची ही सभा होणार असल्यानं या सभेमध्ये अजित पवार नेमकं काय बोलणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
