किल्ले रायगडावर गडदेवता शिरकाई देवीला गोगावले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्रिपदासाठी नवस केला होता. जर मंत्री झालो तर केलेला नवस शिवराज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला फेडेन, असे गोगावले म्हणाले होते.
भरत गोगावलेंनी किल्ले रायगडावरील शिरकाई देवीचा नवस फेडला
त्यानुसार महायुतीच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी आज शिरकाई देवीला केलेला नवस फेडला. भरत गोगावले हे देखील रायगडावर हजर होते. शिवराज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला किल्ले रायगडावर गड देवता शिरकाई देवीचे पुजेच्या वेळी हा नवस फेडण्यात आला. मात्र हा नवस काय होता, हे कळू शकले नाही.
advertisement
भरत गोगावले यांची घोर निराशा झाली होती, कोटाची घडीच मोडायला मिळाली नव्हती
महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात शिवसेना शिंदे गटाच्या नेतृत्वात नवे सरकार बनले. त्या सरकारमध्ये काही महिन्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादीही सामील झाली. उर्वरित अडीच वर्षांचा कार्यकाळ महायुतीने पूर्ण केली. परंतु मंत्रिपदाची आस लावून बसेलल्या भरत गोगावले यांना जंग जंग पछाडूनही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. मला संधी मिळणारच, असे ते प्रसिद्धी माध्यमांवर सांगायचे. मी मंत्रिपदाचा कोट शिवलाय, तो घालून मंत्रिपदाची शपथ घेणार, असेही आवर्जून ते सांगायचे. परंतु पहिल्या कार्यकाळात हुकलेली संधी दुसऱ्या कार्यकाळात मात्र गोगावले यांना मिळाली. महायुतीच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी खात्याची जबाबदारी सोपवील आहे. असे असले तरी गोगावले यांचा संघर्ष सध्या रायगडच्या पालकमंत्रिपदावरून आदिती तटकरे यांच्याशी सुरू आहे. दोघांच्या भांडणात पालकमंत्रिपदच रिक्त ठेवण्यात आले आहे. दोघांच्या भांडणात पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्याची राज्याच्या राजकारणात ही बहुधा पहिलीच वेळ असावी.