नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळच्या सुमारास नारपोली येथील भंडारी चौक भागात प्रभाग क्रमांक २० मधील काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार सुरू होता. या वेळी काँग्रेस पक्षाच्या काही महिला घरोघरी जाऊन प्रचार करत होते. याचवेळी त्यांची रॅली जेव्हा भंडारी चौकातील भाजप कार्यालयासमोर आली. त्यावेळी वादाची ठिणगी पडली. दोन्ही गटांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, काही वेळातच या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला आणि जोरदार दगडफेक केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी पळापळ झाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
advertisement
पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
घटनेची माहिती मिळताच नारपोली आणि भोईवाडा पोलीस ठाण्यातील मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या हाणामारीत जखमी झालेल्या दोन कार्यकर्त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या असून, रात्री उशिरापर्यंत नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या राड्यामुळे भिवंडीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पोलीस प्रशासनाने उमेदवारांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
