अलीकडेच, विद्यार्थ्यांच्या खास सहलीसाठीच महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना परवडणारा आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बस डेपोमधून शाळांना सहलीसाठी 800 ते 1000 नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
advertisement
दरम्यान, दरवर्षी शैक्षणिक सहलीसाठी परिवहन महामंडळाला तब्बल 100 कोटी रुपयांचा निधी मिळतो. या सहलींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राज्यातील गड- किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, पर्यटन स्थळांना पाहायला नेतात. शैक्षणिक सहलीसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाते. पण, परराज्यातील सहलीसाठी शासनाकडून सवलत मिळत नाही. ५० टक्क्यांची सवलत ही महाराष्ट्रापुरतीच आहे. सहलीसाठी एसटी बस बुकिंग करण्यासाठी सुरवातीलाच संपूर्ण रक्कम शाळेला भरावी लागते. दरम्यान, गतवर्षी शैक्षणिक सहलीसाठी अनेक शाळांची जुन्या बसगाड्यांमुळे खूपच पंचाईत झाली होती.
जुन्या बसेसमुळे काही शाळांची दोन- चार दिवसांची सहल एक- दोन दिवसांनी लांबली होती. बसेस बंद पडल्यामुळे काही तास वाटेतच थांबून पर्यायी गाड्यांमधून विद्यार्थ्यांना पुढे मार्गस्थ व्हावे लागले. चालु शैक्षणिक वर्ष 2025- 26 साठी परिवहन मंत्र्यांनी प्रत्येक आगाराचे प्रमुख आणि विभागाचे प्रमुखांना आपआपल्या हद्दीतील शैक्षणिक संस्थेशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले. शिवाय, शालेय विद्यार्थ्यांना या शैक्षणिक सहलीमध्ये राज्यातील प्रमुख ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेटण्याचे नियोजन करण्यासाठी आगार प्रमुख, स्टेशन अधिकारी, शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना भेटतील, असे त्यात म्हटले आहे. त्यातून किती बसगाड्या सहलीसाठी लागतील, याचा अंदाज येईल.
एसटी बसमधील प्रवास सुरक्षित असतो. अगदी खेड्यापासून शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी लालपरी म्हणजेच एसटी बस 24 तास प्रवाशांची सेवा बजावते. अनुभवी चालक, आरामदायी बैठक व्यवस्था आणि सुरक्षित प्रवासाची हमी ही लालपरीची वैशिष्ट्ये आहेत. पण, अचानक प्रवासादरम्यान कधी अपघात झाला तर शैक्षणिक सहलीत सहभागी विद्यार्थ्यांसाठी दहा लाखांचा विमा दिला जातो.
