रविवारी हितेशची दुचाकी भुसावळ येथील तापी नदी पुलावर आढळून आली होती. यासंदर्भात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र आज सकाळी सुमारे 11 वाजता स्थानिक मच्छीमारांना तापी नदीत तरंगताना युवकाचा मृतदेह आढळून आला. ही बाब समजताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.
मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी हा मृत्यू आत्महत्या नसून घातपाताचा असल्याचा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. जोपर्यंत या घटनेमागील सूत्रधार कोण आहे आणि कुणी हत्या केली आहे याचा सखोल तपास होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली.
advertisement
या मागणीसाठी नातेवाईक व मित्रपरिवाराने निंभोरा पोलीस ठाण्यात मृतदेह सुमारे एक ते दीड तास ठेवून ठिय्या आंदोलन केले. विवरा गावातील नागरिकही मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले असून वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले होते. संबंधित दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आंदोलकांकडून करण्यात येत होती.
दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले
दरम्यान, सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील तसेच निंभोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी हरिदास बोचरे यांनी घटनास्थळी येऊन नातेवाईक आणि जमावाची समजूत काढली. सखोल तपास करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर सुमारे दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात विवरा येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा तपास पोलीसांकडून सुरू असून हा मृत्यू आत्महत्या की हत्या, याबाबतचा सत्य शोधण्यासाठी सर्व बाजूंनी चौकशी केली जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
