चेतनसिंह केदार हे सांगोला तालुक्यातील चोपडी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले सदस्य असून सध्या ते भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या पत्नी सुजाता केदार या शहरातील नगरपालिकेत नगरसेविका आहेत. मात्र, दोघांचीही नावे शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही मतदार याद्यांमध्ये नोंद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी अधिनियमाच्या कलम 31 नुसार एका व्यक्तीचे नाव दोन वेगवेगळ्या मतदार याद्यांमध्ये असू शकत नाही. या तरतुदीचे उल्लंघन झाल्याने चेतनसिंह केदार यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व तसेच सुजाता केदार यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
advertisement
सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी
ही याचिका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आर. वाय. घुटुकडे यांनी न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेत केदार दाम्पत्याने कायद्याच्या तरतुदींचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायालय या प्रकरणावर कोणता निर्णय देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकीत पडसाद उमटण्याची शक्यता
दरम्यान, या घडामोडीमुळे सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची अडचण वाढण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असतानाच जिल्हाध्यक्षांवरच सदस्यत्व रद्द होण्याची टांगती तलवार आल्याने भाजपच्या रणनीतीवर परिणाम होऊ शकतो. विरोधकांकडून या प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली जात असून आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा :
