मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचा दिवस अतिशय महत्वाचा ठरला आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली आहे. महानगरपालिका निवडणूका या एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता या युतीवर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंना डिवचणारी पोस्ट केली आहे.
advertisement
आशिष शेलारांची पोस्ट काय?
आशिष शेलार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ठाकरे बंधूंना डिवचणारी कविता पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की,
घेरलं होतं मातोश्रीवरील "विठ्ठलाला" बडव्यांनी..
तुमच्या मते, पक्षाचा ताबा घेतला होता चार कारकुनांनी...
एवढ्या मोठ्या संघटनेला संपवण्यात तुम्हाला व्हायचे नव्हते "भागीदार"
सगळ्या पदांचे राजीनामे देत भाषण केले होते खुमासदार !
आज तेच बडवे आणि तेच कारकून चालणार का?
त्यांच्यासोबत बेमालूमपणे भागीदार होणार का?
"लाव रे तो व्हिडीओ" असे आता मुंबईकर म्हणतील
तुमची जुनी भाषणे काढून आरसा समोर धरतील!
तुमचा चेहरा बघून तुम्हाला भीती नाही ना वाटणार?
एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही ना लुटणार?
मुंबईकर गल्लोगल्लीत तुम्हाला विचारणार...
"नेमके कशासाठी झाला होतात त्यावेळी वेगळे?"
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"
तुटू नका, फुटू नका; मराठी अस्मिता जपा – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी मराठी जनतेला भावनिक साद घालत एकजुटीचा संदेश दिला. ते म्हणाले की, आज घडणाऱ्या घडामोडांकडे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विधानसभेच्या निवडणुकांच्या काळात भाजपकडून ‘बटेंगे तो कटेंगे’ असा अपप्रचार करण्यात आला होता, याची आठवण करून देत त्यांनी मराठी माणसांना सावध राहण्याचे आवाहन केले.
“आता जर चूक झाली, तर त्याचे परिणाम गंभीर असतील. आज जर आपण विभागलो, तर पूर्णपणे संपून जाऊ,” असा इशारा देत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की मराठी समाजाने कोणत्याही परिस्थितीत तुटू नये, फुटू नये. मराठी अस्मितेचा वारसा जपण्याचे आवाहन करत त्यांनी म्हटले की, हाच संदेश त्यांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला द्यायचा आहे.
मराठी माणूस स्वभावाने कुणाच्या वाटेला जात नाही; मात्र कोणी त्याच्या स्वाभिमानाला हात घातला, तर तो शांत बसत नाही आणि प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहत नाही, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
