मकर संक्रांतीच्या साधारण महिनाभर आधीच जालना शहरातील बडी सडक घेवर आणि फेनीच्या दुकानांनी गजबजू लागते. दूध, तूप, मैदा आणि साखर या साहित्याचा वापर हे दोन्ही पदार्थ तयार करताना केला जातो. घेवर हे जालना शहरातच बनवले जाते. तर फेनी हैदराबाद येथून जालना शहरात येते.
advertisement
ज्या पद्धतीने आपण तीळ गूळ खायला देतो. त्याचप्रमाणे घेवर आणि फेनी एकमेकांना भेट म्हणून देण्यात येतात. शहरातील व्यापारी वर्गात हे पदार्थ विशेष लोकप्रिय आहेत. आपल्या आप्तेष्टांना अगदी परदेशातही घेवर फेनीची पाठवणी केली जाते. दरम्यान महिनाभराच्या या कालावधीत व्यावसायिकांचा 50 हजार ते 1 लाख रुपयांचा व्यवसाय होतो. त्यामुळे ग्राहकांबरोबरच विक्रेत्यांच्या आयुष्यातही हे दोन्ही पदार्थ गोडवा पेरतात.
आम्ही पंधरा वर्षांपासून या व्यवसायात आहोत. लेकीबाळींना देण्यासाठी लोक यांची खरेदी करतात. 300 रुपये किलो असा दोन्ही पदार्थांचा दर आहे. या महिनाभरात 50 हजारांची कमाई होते, असं व्यावसायिक लखन भुरेवाल यांनी सांगितलं.





