मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकासाभिमुख राजकारण आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे अचूक निवडणूक नियोजन यांच्या बळावर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या निकालांमुळे राज्यातील राजकारणात देवेंद्र-रविंद्र ही जोडगोळी सार्थ ठरली असून, तुमची आमची भाजपा सर्वांची हे प्रचारगीतातील बोल जनतेने खरे करून दाखवल्याची भावना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच आदराने घेतल्या जाणाऱ्या 'देवेंद्र आणि रविंद्र' या जोडगोळीच्या नावावर आजच्या निकालांनी अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची विकासाची दूरदृष्टी आणि चव्हाण यांचे संघटन कौशल्य यामुळे पक्षाने प्रथमच अशा प्रकारचे अभूतपूर्व यश मिळवले आहे. पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, जनतेने या निवडणुकीतून भाजपाला दिलेला कौल हा पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणांचा विजय आहे.
सहा महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि आक्रमक शैलीत महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यांच्या संयमी पण गरज पडल्यास आक्रमक होण्याच्या पद्धतीमुळे अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रामुख्याने कोकणात वर्चस्व असलेल्या चव्हाण यांच्या नेतृत्वाचा या निवडणुकीत कस लागला होता, ज्यामध्ये ते 'पैकीच्या पैकी' गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत, असे या निकालांवरून स्पष्ट होत आहे.
राज्यात अनेक ठिकाणी भाजपाची थेट लढत महायुतीतील सहकारी असलेल्या शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवारांशी होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय चातुर्यामुळे आणि चव्हाण यांच्या अचूक नियोजनामुळे भाजपाने अनेक ठिकाणी या लढती जिंकल्या. विशेष म्हणजे, हा विजय मिळवताना महायुतीला किंवा राज्याच्या सत्तेला कुठेही बाधा पोहोचणार नाही, याचे गणित या दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे अत्यंत अचूकपणे सोडवले आहे. याच निकालांच्या माध्यमातून भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीला त्यांची जागा दाखवून दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
