याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची उच्च स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती भाजप मराठवाड्यात स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांकडून याबाबतची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
advertisement
मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या बैठकीत नक्की काय चर्चा झाली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री उशिरापर्यंत पार पडलेल्या बैठकीत आगामी निवडणूक स्वबळावर लढायची की महायुती म्हणून लढायची यावर सविस्तर चर्चा झाली. एकनाथ शिंदे गटाशी भाजपचं थोडेफार जुळेल, मात्र राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती नकोच, असा सूर या बैठकीत उपस्थित असलेल्या नेत्यांचा होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. यावेळी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपापली भूमिका मांडली.
राज्यात सरकारला सकारात्मक वातावरण आहे का? या प्रश्नावर पदाधिकाऱ्यांनी होकार भरला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेने दिलेल्या त्रासाचा पाढा वाचला आणि स्वबळावर लढण्याची भूमिका अनेकांनी मांडली, बहुसंख्या पदाधिकाऱ्यांचा स्वबळावर निवडणूक लढण्याचा सूर पाहता भाजप मराठवाड्यात वेगळी रणनीती आखू शकते, असं सांगितलं जातंय. आठही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची भूमिका समजून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय घेण्याचे सुचवलं असल्याची सूत्रांची माहिती आहे.