एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या आणि नामांकित खाजगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असताना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी मतदारसंघाचे भाजप आमदार संजय पुराम यांनी एक वेगळा आणि अनुकरणीय आदर्श घालून दिला आहे. त्यांनी स्वतःच्या मुलीला समृद्धी संजय पुराम हिला खासगी किंवा कॉन्व्हेंट शाळेत न घालता आपल्याच गावातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत आठवीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.
advertisement
आमदार पुराम यांच्या या निर्णयामुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे. पुराडा ढीवरीनटोला येथील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या या शासकीय शाळेत समृद्धीला दाखल करून त्यांनी केवळ आपल्या कुटुंबातच नव्हे तर संपूर्ण समाजात सरकारी शिक्षण संस्थांबद्दलचा विश्वास दृढ केला आहे. सरकारी शाळांमध्येही दर्जेदार शिक्षण मिळू शकते आणि त्या खासगी शाळांना पर्याय ठरू शकतात, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
या निर्णयानंतर आमदार संजय पुराम यांनी सर्व पालकांना आवाहन केले आहे की, मुलांच्या शिक्षणासाठी केवळ खासगी शाळांचा विचार न करता,सरकारच्या शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता आणि उपलब्ध सोयी-सुविधांकडेही सकारात्मक दृष्टीने पाहावे.
लोकांना सांगायचं की आपल्या मुलांना आश्रम शाळेत टाका, आणि स्वतःच्या मुलांना खासगी शाळेत शिकवायचं, हा कुठला न्याय? म्हणूनच आज मी माझ्या स्वतःच्या मुलीला पुराडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत दाखल केलं. ही कृती कुठल्याही प्रसिद्धीसाठी नाही, ही आहे एक जाणीवपूर्वक चाललेली कृती म्हणजेच समाजात समता टिकवण्यासाठी, आणि गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी म्हणून. आज माझ्या निर्णयाने जर समाजातील एक पालक सुद्धा शासनाच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास ठेवून आपल्या मुलाचं भविष्य घडवायला पुढे येईल, तर हाच माझ्या या पावलांचा यशस्वी अर्थ आहे. असे आमदार संजय पुराम यांनी सांगितले.