लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा लातूर जिल्हा यांच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला रविंद्र चव्हाण, संभाजी पाटील निलंगेकर, रमेश कराड, अभिमन्यू पवार, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार पाशा पटेल, माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे, लातूर शहरचे भाजपा जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, लातूर ग्रामीणचे भाजपा जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, भाजप संघटनमंत्री संजय घोडगे, अर्चनाताई पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांमध्ये जान भरताना रविंद्र चव्हाण यांनी काँग्रेसचा सुपडासाफ करण्याचा संकल्प बोलून दाखवला.
advertisement
रविंद्र चव्हाण काय म्हणाले?
लातूर महापालिकेची निवडणूक सुरू आहे. येथील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लक्षात येते की लातूरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात काही शंका नाही, असे वक्तव्य रविंद्र चव्हाण यांनी केले.
लातूरातून विलासरावांच्या आठवणी पुसणारा अजून जन्माला याचयाय-हर्षवर्धन सपकाळ
स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण नाही झाला. अनेक जण इच्छा बाळगून आलेत आणि स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चव्हाण यांच्या वक्तव्याला उत्तर दिले.
भाजपवाल्यांनो लक्षात ठेवा, करारा जवाब मिलेगा
विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केलं. आज त्यांच्याबद्दल हे सत्तेचा माज असलेले भाजप नेते लातूरात येऊन बरळून जातात की साहेबांच्या आठवणी पुसल्या गेल्यात. त्यांना काय समजणार विलासराव देशमुख साहेबांचं लातूर शी असलेलं नातं. लातूरच्या कर्तुत्वसंपन्न सुपुत्राचा अपमान लातूरकर कधीही सहन करणार नाही, भाजपवाल्यांनो याद राखा, करारा जवाब मिलेगा, असा इशाराही सपकाळ यांनी दिला.
