भिवंडीत महापौर निवडणुकीपूर्वीच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत कोणता पक्ष कुणाला साथ देणार, नारायण चौधरींना भाजपचे किती नगरसेवक साथ देणार याची उत्सुकता होती. अखेरपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित भिवंडी सेक्युलर फ्रंटचे नारायण चौधरी विजयी झाले. नारायण चौधरींना दोन दिवसांपूर्वीच भाजपची साथ सोडत काँग्रेसचा समावेश असलेल्या सेक्युलर फ्रंटमध्ये सामील झाले होते.
advertisement
6 नगरसेवकांची मतं फुटल्यानं भाजपला मोठा धक्का
महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे 30, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 आणि भाजपची फुटलेली सहा असं मिळून 48 मतं नारायण चौधरींच्या पारड्यात पडली. भिवंडी महापालिका निवडणुकीत सहा नगरसेवकांची मतं फुटल्यानं भाजपला मोठा धक्का बसला आहे. भिवंडीत महापालिकेत भाजपचे 22 नगरसेवक होते.
उमेदवारी भाजपनं कायम ठेवल्यानं नारायण चौधरी नाराज
भाजपकडून सुरुवातीला नारायण चौधरी आणि स्नेहा पाटील यांचे अर्ज दाखल केले होते. मात्र स्नेहा पाटील यांचाच उमेदवारी भाजपनं कायम ठेवल्यानं नारायण चौधरी नाराज झाले. नाराज झालेल्या नारायण चौधरींनी थेट काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सेक्युलर फ्रंटशी संधान साधलं. काँग्रेसच्या सेक्युलर फ्रंटच्या गोटात सामील झालेल्या नारायण चौधरींसाठी काँग्रेस महापौरपदाचे उमेदवार तारिक मोमीन यांना अर्जही मागे घेण्यास सांगितलंय.
कोणाला किती मतं मिळाली?
अखेर महापौरपदाच्या रिंगणात भिवंडी सेक्युलर फ्रंटकडून नारायण चौधरी, भाजपच्या स्नेहा पाटील आणि कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील रिंगणात शिल्लक राहीले होते. हात उंचावून झालेल्या मतदानात नारायण चौधरींना 48, भाजपची सहा मतं फुटल्यानं स्नेहा पाटील यांना 16 मतं, तर कोर्णाक विकास आघाडीचे विलास पाटील यांना 25 मतं मिळाली.
शिवसेना आणि भाजपमधील मतभेदही या निवडणुकीच्या निमित्तानं समोर
भिवंडीत महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवलेल्या शिवसेना आणि भाजपमधील मतभेदही या निवडणुकीच्या निमित्तानं समोर आले . भाजपच्या महापौरपदाचा उमेदवार असतानाही शिंदेंच्या शिवसेनेनं आपल्या नगरसेवकांना कोर्णाक विकास आघाडीच्या विलास पाटील यांना मतदान करण्यासाठी व्हीप बजावला होता...विलास पाटील यांना कोर्णाक विकास आघाडीचे 4, शिंदेंच्या शिवसेनेचे 12, समाजवादी पार्टीचे 6 आणि भिवंडी विकास आघाडीची 3 मतं अशी 25 मतं मिळाली आहेत.
काँग्रेसनं चंद्रपूरचा वचपा भिवंडीत काढला
भिवंडीत उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे तारिक मोमीन विजयी झालेत. तारिक मोमीन यांना 43मते मिळाली. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संख्येक्षा एक जास्त मतं तारिक मोमीन यांना मिळालंय. चंद्रपुरात महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास भाजपनं हिरावून घेतला होता. काँग्रेसनं चंद्रपूरचा वचपा भिवंडीत काढत सव्याज परतफेड केलीय.
भाजपच्या नारायण चौधरींना गळाला लावत काँग्रेस प्रणित भिवंडी सेक्युलर फ्रंट भिवंडीत किंगमेकर ठरली आहे. एकूणच भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी भिवंडी सेक्युलर विकास फ्रंटच्या माध्यमातून भिवंडीचे महापौर झाले आहेत.
