TRENDING:

आगामी निवडणुका कशा जिंकायच्या? महाराष्ट्र पॅटर्नचा बोलबोला, भाजपचं पक्कं सूत्र, अंतर्गत टीमचे काम सुरू

Last Updated:

BJP Strategy For Election: मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या मुद्द्यावरून प्रचंड रोष असतानाही भाजपने निवडणुकीची गणिते जुळवून आणली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गत चार महिन्यांपूर्वी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचे पानिपत केले. शेतकऱ्यांच्या हमीभावाचा मुद्दा, मराठा आरक्षण, दलितांच्या मनातील अस्वस्थता, मुस्लिमांच्या मनातील आघाडीबद्दलचा हळवा कोपरा अशा मुद्द्यांच्या भरोशावर आपण सत्तेत येणार, असे आघाडीला वाटत होते. परंतु भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि संघाच्या संलग्न इतरही संस्थाच्या मदतीने निवडणूकविषयक सूक्ष्म रणनीती आखून निवडणूक कशी जिंकायचे असते याचे प्रात्याक्षिक संपूर्ण देशाला दाखवले.
भाजपची निवडणूकविषयक रणनीती
भाजपची निवडणूकविषयक रणनीती
advertisement

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही भाजपने हार मानली नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या मुद्द्यावरून प्रचंड रोष असतानाही भाजपने निवडणुकीची गणिते जुळवून आणली. निवडणूक निकालानंतर तज्ज्ञांच्या विश्लेषणात 'लाडकी बहीण'सहित भाजपने केलेले धार्मिक ध्रुवीकरण आणि त्यामुळे झालेले मतांचे विभाजन हे मुद्दे प्रकर्षाने मांडले गेले.

advertisement

भाजपचं पक्कं सूत्र, अंतर्गत टीमचे काम सुरू

महाराष्ट्रातील मतविभाजनाच्या पॅटर्नवर केंद्रीय भाजपची निवडणूकविषय टीम काम करते आहे. यंदाच्या वर्षात दिल्ली आणि बिहारसारख्या राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. गेली १० वर्षे केजरीवाल दिल्लीत तळ ठोकून आहेत. नरेंद्र मोदींसारखे प्रभावी नेतृत्व असतानाही भाजपला दिल्लीत विजय मिळवता आलेला नाही. दुसरीकडे नितीश कुमार यांचे महत्त्व कमी करून भाजपला बिहारमध्ये आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री खुर्चीवर बसवायचा आहे. त्यासाठी दोन्ही राज्ये भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या राज्यांच्या निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयोग उत्तमरित्या जमून आल्यास गुलाल दूर नसेल याची खात्री भाजपला आहे. त्याचमुळे केंद्रीय स्तरावरील निवडणुकीची तयारी करणाऱ्या टीमने यावर काम सुरू केले असल्याची माहिती मिळते आहे.

advertisement

येणाऱ्या काळात जिथे जिथे निवडणुका आहेत तिथे मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयोग भाजपकडून राबवला जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक जातीच्या महिला, सुशिक्षित बेरोजगार आणि नवमतदार यांना मुख्यत्वे डोळ्यासमोर ठेवून भाजप रणनीती आखत आहे.

मतांच्या ध्रुवीकरणाचा 'महाराष्ट्र पॅटर्न' काय?

देशासह महाराष्ट्रात एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणुका संपन्न झाल्या. या निवडणुकीत भाजपसहित महायुतीची प्रचंड पिछेहाट झाली. भाजपची २१ खासदारांची गाडी थेट ९ जागांवर आली. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, संविधानावरून केलेले दावे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा प्रश्न, महागाई आदी मुद्द्यांचा भाजपला फटका बसला होता. त्याचे प्रतिबिंब निकालात उमटल्याने लोकसभेचा निकाल हा निश्चित भाजपसाठी धक्का देणारा होता. लोकसभा निवडणुकीचा जसा निकाल लागला तसे भाजप नेतृत्व खाडकन जागे झाले. भाजपच्या विरोधात जाणाऱ्या मतांचे ध्रुवीकरण केल्याचा त्याचा पक्षाला फायदा होईल, असे अभ्यासाअंती समोर आल्याने त्यावरील कामाला तातडीने सुरूवात करण्यात आली. 'बटेंगे तो कटेंगे' 'एक है तो सेफ है' अशी घोषणा देऊन हिंदू मतांचे एकत्रीकरण होईल, याच्यावर भाजपने भर दिला.

advertisement

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आणि मतांचे राजकारण प्रचंड वर्चस्व आहे. प्रचंड अभ्यास करून आणि रणनीती आखून मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयोग राबवून तसेच ओबीसींना कुरवाळून भाजपने मराठा वर्चस्व मोडित काढले. काँग्रेस आणि सहकारी पक्षांनी मराठा आणि मुस्लिम समाजाच्या मतांच्या भरोशावर विजयाची स्वप्ने पाहिलेली असताना त्यांच्या मतांचे विभाजन शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात घडवून आणत आघाडीच्या स्वप्नांवर भाजपने पाणी फेरले. निवडणुकीच्या तोंडावर हिंदू दलितांना चुचकारून सवर्ण जातींचे मतेही भाजपने घेतली. त्याचमुळे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात पहिल्यांदाच १३२ जागा जिंकून विक्रम करता आला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आगामी निवडणुका कशा जिंकायच्या? महाराष्ट्र पॅटर्नचा बोलबोला, भाजपचं पक्कं सूत्र, अंतर्गत टीमचे काम सुरू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल