'निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना संधी'
गेल्या तीन वर्षांपासून पक्षासाठी अहोरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून, ऐनवेळी पक्षात आलेल्यांना आयारामांना 'एबी' फॉर्म दिल्याचा आरोप नाराज इच्छुकांनी केला. यानंतर भाजपमधील हा असंतोष उफाळून आला आहे. नाशिकरोडच्या सहा प्रभागांतील २३ जागांसाठी भाजपकडे १८४ इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, प्रत्यक्ष यादी जाहीर होताना निष्ठावंतांची नावे कापली गेल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटला.
advertisement
गाजर दाखवत संताप व्यक्त
नाराज कार्यकर्त्यांनी सुरुवातीला शहराध्यक्ष सुनील केदार यांना गाजर दाखवत त्यांचा निषेध केला. "जर तिकीट द्यायचे नव्हते, तर तसे आधीच स्पष्ट करायला हवे होते. ऐनवेळी विश्वासघात का केला?" असा सवाल करत कार्यकर्त्यांनी केदार आणि घंटे यांना घेराव घातला. त्यानंतर या दोन्ही नेत्यांना कार्यालयात नेऊन कार्यकर्त्यांनी शटर ओढून घेतले. "आता प्रभागात भाजपच्या उमेदवाराला फिरू देणार नाही," असा आक्रमक पवित्राही यावेळी पदाधिकाऱ्यांनी घेतला.
केवळ भाजपचे कार्यकर्तेच नव्हे, तर मित्रपक्ष असलेल्या रिपाइंनेही (आठवले गट) भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली. रिपाइंला दोन जागा देण्याचे आश्वासन भाजपनं दिलं होतं, मात्र ते पाळले गेलं नाही. यामुळे रिपाइंचे माजी नगरसेवक संजय भालेराव, अमोल पगारे आणि समीर शेख यांनी तीव्र संताप व्यक्त करत केदार यांना जाब विचारला.
या घटनेनंतर पोलिसांना पाचारण करावं लागलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत २० मिनिटांनंतर शहराध्यक्षांची सुटका केली असली, तरी कार्यकर्त्यांचा रोष अद्याप कायम आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा उद्रेक भाजपच्या अडचणी वाढवणारा ठरू शकतो.
