खासदार, आमदार, माजी नगरसेवक यांचे भाऊ, वहिनी, पत्नी, मुले-मुली यांना थेट निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधींच्या नातेवाइकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे घेतला होता. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीत हा निर्णय भाजपलाच विसर पडल्याचे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिसून आले.
advertisement
सोमवारी भाजपने दिलेल्या एबी फॉर्ममध्ये अनेक उमेदवारांचे वडील, भाऊ हे विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार असल्याचे समोर आले. हाच पायंडा शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसनेही पाळल्याने वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते उमेदवारीपासून वंचित राहिल्याची भावना उघडपणे व्यक्त होत आहे.
भाजपकडून माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुलुंडमधून पुन्हा संधी देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद आणि वहिनी हर्षिता नार्वेकर यांनाही उमेदवारी मिळाली आहे. माजी आमदार राज पुरोहित यांचे पुत्र आकाश पुरोहितही निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
शिवसेना (उबाठा)कडून आमदार सुनील प्रभू यांचा मुलगा, माजी आमदार प्रकाश फातर्पेकर यांची कन्या, तसेच आमदारांच्या पत्नी आणि भावंडांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून आमदार अस्लम शेख यांचा मुलगा हैदर शेख याला तिकीट देण्यात आले असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजितर पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी मिळाली आहे. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, बहिण डॉ. सईदा खान आणि बुशरा परवीन मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
