बुलढाणा अर्बन बँक पळून जात असल्याची चर्चा सोशल मीडियावर सकाळपासून रंगली होती. त्यामुळे जालना जिल्ह्यातल्या परतूर येथील बुलढाणा अर्बन बँकेत ठेविदारांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी ठेविदारांमध्ये एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं.त्यामुळं परतूर येथील बुलढाणा अर्बन बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी ठेविदारांनी मोठी गर्दी केली होती.
विशेष म्हणजे रात्र झाली तरी ठेविदार बँकेतल्या कर्मचा-यांना बाहेर निघू देत नव्हते. यावेळी काही ग्राहकांनी आपले ठेव खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली, तर काहींनी रोख रक्कम काढण्यासाठी गर्दी केली. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असला तरी सर्व व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कर्मचारी प्रयत्नशील होते.
advertisement
या परिस्थितीत शाखा व्यवस्थापकांनी ग्राहकांना दिलासा देत स्पष्ट केले की बुलढाणा अर्बन बँक बंद होणार नाही. ग्राहकांच्या सोयीसाठी बँक रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असून, सर्वांनी शांतता व शिस्त राखून आपले व्यवहार करावेत, असे आवाहन त्यांनी केले. बँकेचे व्यवहार नियमितपणे सुरू राहणार असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, अफवांमुळे बँकिंग व्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता प्रशासनानेही ग्राहकांना योग्य माहिती देण्याची गरज असल्याचे मत ग्राहकांनी व्यक्त केले आहे.
