कालच शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणाऱ्या १० नगरसेवकांचा गट आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या अनपेक्षित भेटीमुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महापौरपदासाठी 'बार्गेनिंग' सुरू?
शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आणि दोन अपक्ष अशा एकूण १० नगरसेवकांनी सध्या 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. काल, रविवारी या गटाने मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली होती. "जो पक्ष आम्हाला महापौरपद देईल, त्यालाच आम्ही पाठिंबा देऊ," या आपल्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. ठाकरे गटाकडून अद्याप स्पष्ट आश्वासन न मिळाल्याने हा गट आता भाजपच्या दरबारी जाणार असल्याची चर्चा आहे.
advertisement
बैठकीत 'हे' दिग्गज असणार उपस्थित
आज दुपारी होणाऱ्या या संभाव्य बैठकीत केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर भाजपचे संकटमोचक मानले जाणारे आमदार बंटी भांगडिया आणि किशोर जोरगेवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र, या बैठकीला सर्व १० नगरसेवक जाणार की केवळ प्रमुख शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, याबाबत अद्याप गुप्तता पाळण्यात आली आहे.
सत्तेचे गणित नेमके कोणाकडे?
चंद्रपूर मनपात सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर गाठणे कोणत्याही एका पक्षाला अद्याप शक्य झालेले नाही. अशा स्थितीत हे १० नगरसेवक 'किंगमेकर'च्या भूमिकेत आले आहेत.
आजच्या या बैठकीनंतर चंद्रपूरचा पुढचा महापौर कोणाचा असेल, याचे चित्र स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे. भाजप या नगरसेवकांच्या अटी मान्य करणार की हे नगरसेवक पुन्हा महाविकास आघाडीकडे वळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस सत्तेपासून दूर राहणार?
तर, दुसरीकडे काँग्रेस हा चंद्रपूरमध्ये मोठा पक्ष असूननही त्यांच्याकडून सत्तेची समीकरण जुळवताना यश मिळत नसल्याचे दिसत आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीदेखील दिसून आली. त्यातच ठाकरे गटाने अडीच वर्ष महापौर पद अथवा स्थायी समिती अध्यक्षपद मागितल्याने काँग्रेसची कोंडी झाली.
