नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पतीपासून वेगळं राहते. या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिला लग्नाचं आमिष दाखवून आरोपीनं तिच्यावर वारंवार अत्याचार केला. जेव्हा पीडितेनं आरोपीला लग्नाबद्दल विचारणा केली, तेव्हा आरोपीनं लग्नाला नकार देत तिला बेदम मारहाण केली. या प्रकरणी मुख्य आरोपी दत्तू रामचंद्र दुबिले आणि त्याचा मित्र योगेश इथापे यांच्यावर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
कमळापूर येथे बुधवारी (३० जुलै) रात्री ही घटना घडली. २७ वर्षीय पीडित महिला ही रांजणगाव इथं आपली दोन मुले आणि आईसोबत राहते. ती खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करते. चार वर्षांपूर्वी तिची ओळख दत्तू दुबिलेसोबत झाली. 'मी तुला आणि तुझ्या मुलांना सांभाळीन, घर देईन,' असं आमिष आरोपीनं दाखवलं होतं. त्याच्यावर विश्वास ठेवून पीडित महिला रिलेशनशिपमध्ये आली. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दुबिले तिच्यावर संशय घेऊन तिला मारहाण आणि शिवीगाळ करत होता. यासंदर्भात पीडितेनं यापूर्वीही पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
पीडितेला डांबून बेल्टने मारहाण
घटनेच्या दिवशी बुधवारी पीडित महिला किराणा दुकानात गेली होती. त्यावेळी दुबिले आणि त्याचा मित्र योगेश इथापे यांनी तिला दुचाकीवरून 'घर दाखवतो,' असे सांगून कमळापूर येथील शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तेथे दुबिलेने तिला चामड्याच्या बेल्टने आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिच्या उजव्या हाताच्या बोटाचे हाड फ्रॅक्चर झाले. त्यावेळी योगेशनेही 'तुला फुकटात घर हवं का?' असे म्हणत शिवीगाळ केली. पोलिसांकडे गेल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.