नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरएसएसच्या सदस्यांकडून एका कॉलेजच्या गेटवर सदस्य नोंदणीचा कार्यक्रम घेतला जात होता. यावर काही समाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. कॉलेजच्या बाहेर अशाप्रकारे सदस्य नोंदणी करू नका. मंदिराच्या बाहेर अशा नोंदण्या करा. विद्यार्थ्यांना शिक्षण करू द्यायचं की, त्यांना धार्मिक संघटनेत घ्यायचं? परवानगी न घेता तुम्ही अशाप्रकारे गेटवर कसं काय नोंदणी कार्यक्रम करत आहात? अशा प्रकारचा जाब विचारून त्यांचा सदस्य नोंदणीचा कार्यक्रम बंद पाडला.
advertisement
वेदांतनगरमधील पहिली घटना
१० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील तंत्रनिकेतन महाविद्यालयाबाहेर RSS चे काही कार्यकर्ते सदस्य नोंदणीचा कार्यक्रम राबवत होते. यावेळी इथं आलेल्या काही जणांनी आरएसएसच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली. या प्रकरणी राहुल मकासरे, अभिमन्यू अंभोरे, शैलेश चाबुकस्वार आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उस्मानपुरा येथील दुसरी घटना
आरएसएसच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ झाल्याची दुसरी घटना उस्मानपुरा भागात घडली. १४ ऑक्टोबर रोजी रेल्वेस्थानक रस्त्यावर हा प्रकार घडला. या घटनेत धार्मिक भावना दुखावणारे वर्तन केल्याप्रकरणी विजय वाहुळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची कठोर कारवाई
या दोन्ही घटनांमध्ये आरोपींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांना हेतुपुरस्सर शिवीगाळ करून, समाजात वाद आणि धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणांची दखल घेत दोन गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या दोन्ही घटनांचा सखोल तपास पोलीस करत आहेत.