छत्रपती संभाजीनगर : पोलीस व्हावे, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अत्यंत मेहनत आणि कष्टही उमेदवार घेतात आणि शेवटी आपले स्वप्न पूर्ण करतात. आज अशाच एका तरुणाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्याने कंपनीमध्ये काम करत पोलीस भरतीचे स्वप्न पाहिले, त्यासाठी तयारी केली, मेहनत घेतली आणि आपले हे स्वप्न पूर्ण केले.
advertisement
राम उदाट असे या तरुणाचे नाव आहे. राम आता पोलीस झाला आहे. राम उदाट हा मूळचा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील रहिवासी आहे. त्याचे आई वडील शेतीकाम करतात. रामने दहावीपर्यंत शिक्षण हे त्याच्या गावातील शाळेत घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी आणि काम करण्यासाठी तो छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज या ठिकाणी आला.
रामने अकरावी बारावीचे शिक्षण विज्ञान शाखेमधून पूर्ण केले आहे. पण घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्याला शिक्षण घेत कामदेखील करावे लागले. राम एका खाजगी कंपनीमध्ये काम करू लागला. त्यानंतर तो रोज जेव्हा कंपनीत जायचा तेव्हा त्याला पोलीस भरतीची तयारी करणारे उमेदवार दिसत होते.
यानंतर त्यालाही पोलीस भरतीची तयारी करण्याची इच्छा निर्माण झाली. पण घरची आर्थिक स्थिती ही चांगली नव्हती. त्यामुळे त्याने दोन महिने कंपनीमध्ये काम केले आणि त्या ठिकाणाहून जे पैसे मिळाले त्या पैशांमधून त्याने गरुड झेप अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि यानंतर त्याने चांगली तयारी केली.
त्याने भारतीय नौदलाचीही परीक्षा दिली होती. मात्र, अवघ्या काही पॉईंटने त्याचे यश हुकले. मात्र, त्याने परत एकदा पोलीस भरतीची परीक्षा दिली. त्यामध्येही त्याला अपयश आलं. पण तो अशा कठीण परिस्थितीमध्येही खचला नाही आणि परत त्याने नव्याने सुरुवात केली. दुर्दैवाने याच दरम्यान त्याच्या आईचे निधन झाले. आईच्या जाण्याने मात्र, राम पूर्णपणे खचून गेला. पण यामध्ये त्याच्या कुटुंबाने त्याच्या बहिणींनी त्याच्या भावांनी त्याची साथ दिली.
एक गाव एक वाण, एकरी 60 क्विंटल उत्पादन, शेतकरी मालामाल, हे आहे राज्यातील मक्याचे गाव, VIDEO
यानंतर त्याने परत जिद्दीने अभ्यासाला सुरुवात केली. राम हा कंपनीमध्ये काम करायचा. कंपनीमध्ये काम करत असतानाही राम त्या ठिकाणी अभ्यास करायचा. कंपनीतून परत आला की राम दोन्ही वेळेस मैदानाची तयारी करायचा. अशाप्रकारे त्याने संपूर्ण तयारी केली आणि या पोलीस भरतीमध्ये रामची छत्रपती संभाजीनगर शहर पोलीसमध्ये त्याची निवड झालेली आहे. यासोबतच एसआरपीएफ दौंड यामध्येही त्याची निवड झाली आहे.
रामचे शिक्षक काय म्हणाले -
अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये रामने पोलीस भरती दिली आणि त्यामध्ये तो आज पास झाला आहे. त्यासाठी रामने खूप मेहनत केली. त्याची घरची परिस्थिती नसतानाही त्याने कंपनीत काम करून पोलीस भरती दिली आणि आमच्या सर्व शिक्षकांनी देखील सर्वतोपरी मदत केली. राम हा पोलीस झाला, याचा मला आणि माझ्या सर्व शिक्षकांना खूप अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया रामचे शिक्षक निलेश सोनवणे यांनी दिली. रामचा हा प्रवास तरुणासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.