या पारंपरिक रोटमध्ये रवा, साखर, तूप, वेलची, खसखस, काजू, बदाम यांसारख्या ड्रायफ्रूट्सचे मिश्रण वापरले जाते. दूध आणि खव्याचाही वापर केला जातो. त्यामुळे या पदार्थाला एक वेगळीच पौष्टिकता आणि पारंपरिक चव मिळते. साधारणपणे एक रोट 50 रुपयांना मिळत असली तरी ग्राहक मोठ्या प्रमाणात डझननेही रोट बनवून घेतात. साध्या रोटचा दर सुमारे 600 रुपये डझन असून स्पेशल रोट सुमारे 960 रुपये डझन मिळते.
advertisement
रस्त्यावर पैसे मागितले, पण शेवटी ठरवलं अन् ट्रान्सजेंडर मनस्वीनं करून दाखवलं, VIDEO
या बेकरीचा व्यवसाय सध्या पाचवी ते सहावी पिढी सांभाळत आहे. घरातील जवळपास 60 टक्के सदस्य या व्यवसायात कार्यरत आहेत, तर सुमारे 20 कामगारही येथे काम करतात. विशेष म्हणजे ग्राहक स्वतःचे साहित्य घेऊन आल्यास त्यांच्यासाठी रोट बनवून देण्याची परंपराही येथे अजून कायम आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे खास प्रसंगी किंवा नवसासाठी येथे येऊन मोठ्या प्रमाणात रोट तयार करून घेतात.
मोहर्मच्या काळात नवस म्हणून रोट बनवण्याची परंपरा येथे सुरू झाली, असे सांगितले जाते. सुरुवातीला फक्त दोन महिनेच भट्टी सुरू असायची. मात्र 1990 ते 1995 दरम्यान हळूहळू मागणी वाढत गेली आणि आता वर्षभर म्हणजेच बारा महिने ही बेकरी सुरू असते. दररोज 50 ते 100 किलोपर्यंत रोट बनवून नेणारे ग्राहक येथे येत असल्याचे सांगितले जाते.
या रोटची लोकप्रियता इतकी वाढली की महाराष्ट्रासह देशाबाहेरही या बेकरीची चव पोहोचली आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दुबई आणि सौदी अरेबिया येथेही लोक रोट मागवतात. विशेष म्हणजे अनेक मान्यवरांनीही या बेकरीची चव घेतली आहे. राज्यातील नेते अजित पवार आणि शरद पवार तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही येथे तयार होणारी रोट चाखल्याचे सांगितले जाते. याशिवाय प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार हे देखील येथे रोट घेऊन जात असत, अशी माहिती रफिक शेख यांच्याकडून देण्यात आली.
पुण्यातील खाद्यपरंपरेचा एक जिवंत वारसा म्हणून ही बेकरी आजही ओळखली जाते. बदलत्या काळात आधुनिक बेकऱ्या वाढल्या असल्या तरी या पारंपरिक ‘रोट’ची चव आणि इतिहासामुळे आजही खाद्यप्रेमींची येथे नेहमीच गर्दी पाहायला मिळते.





