बुलढाणा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून चिखला गावात तीव्र वाद उफाळून आला असून, या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आहे. गावातील महिलांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. या घटनेत उबाठा शिवसेनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
advertisement
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या एक दिवस आधी गावातील एका खुल्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. मात्र, ही जागा गावातील विविध सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी विशेषतः लग्नसमारंभासाठी वापरली जात असल्याने, पुतळा ग्रामपंचायतीच्या जागेत उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटाने केली होती. याबाबत ग्रामपंचायतीकडे निवेदन देण्यात आले होते. तरीही पुतळा हलवण्यात न आल्याने वाद चिघळला.
अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात
मंगळवारी सकाळी दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वादाला सुरुवात झाली. काही वेळातच हा वाद वाढत गेला आणि महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या गोंधळात संजीवनी वाघ यांना मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. जमावाला पांगवण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन्ही गटांच्या तक्रारी नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत सर्व पक्षांनी आणि ग्रामस्थांनी संयम राखून, सामंजस्याने मार्ग काढावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गावातील शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी चर्चेद्वारे तोडगा काढण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
