विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर माणिकराव कोकाटे, योगेश कदम, संजय शिरसाट, भरत गोगावले, संजय राठोड, नितेश राणे, जयकुमार गोरे आदी मंत्र्यांना वगळण्यात येणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. यातील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर, विरोधकांकडून मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. नागपूरमधील एका कार्यक्रमानंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यावर भाष्य केले. राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य बदलावर फडणवीसांनी भाष्य केले.
advertisement
मंत्रिमंडळात बदल?
मंत्र्यांना देण्यात आलेल्या निर्देशाबाबत त्यांनी सांगितले की, आता या प्रकारे कोणीही बेशिस्त वर्तणूक करेल, तर त्यांना सर्वांना सांगितलं आहे की आम्ही हे खपवून घेणार नाही, कारवाई केली जाईल. हे सर्वांसाठी संकेत आहे. जनतेच्या सेवेसाठी आम्ही आलो आहोत. मात्र त्यावेळेस आपण काय बोलतो, कसं वागतो, आमचा व्यवहार कसा आहे, हे सर्व जनता पाहत असते. त्यामुळे त्यावर अंकुश राहिलाच पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात जी घटना घडली त्या संदर्भात मोठा रोष होता. त्या संदर्भात अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याशी मिळून चर्चा केली आणि चर्चेअंती निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्यात आले आहे. त्यांना दुसरं खातं देण्यात आलं आहे. तर, कृषी खातं दत्ता भरणे यांना देण्यात आला आहे. आता तरी कुठला दुसरा बदल होईल अशी कोणतीही चर्चा नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळात आता तूर्तास कोणतेही बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
धनंजय मुंडे तीन वेळेस भेटले...
धनंजय मुंडे यांनी तीन वेळेस माझी भेट घेतली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मुंडे यांनी वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे, कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या पातळीवर होत नाही, मंत्रिमंडळाची चर्चा मी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
