दिल्ली : चंद्रपूर महापालिकेमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातटाच्या राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये वाद शिगेला पेटला. अखेरीस नगरसेवकांनी घेऊन वडेड्डीवार हे दिल्लीत दाखल झाले. पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर वाद निवळला असल्याचं सांगितलं जात आहे. पण, या वादाच्या निमित्ताने स्थानिक नगरसेवकांची मात्र दिल्लीवारी झाली आहे.
advertisement
चंद्रपूर मधील महापौर मुद्द्यावर राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेस संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते. सोबतच काँग्रेस नेते सुनील केदार आणि खासदार शामकुमार बर्वे देखील उपस्थित होते. जवळपास 45 मिनिटं झालेल्या बैठकीमध्ये महापौर पदाचा तोडगा निघाला अशी माहिती पुढे येत आहे.
नगरसेवकांना घेऊन वडेट्टीवार दिल्लीत
मागील काही दिवसांपासून चंद्रपूर पालिकेत सत्ता स्थापन करण्यावरून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात वाद पेटला आहे. दोन्ही नेत्यांनी निवडून आलेले आपले समर्थक नगरसेवक वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. वडेट्टवार यांनी आपले समर्थक नगरसेवक आपल्यासोबत ठेवले होते. आज दिल्लीत सगळ्या समर्थक नगरसेवकांना घेऊन वडेट्टीवार दिल्लीत पोहोचले. एका मिनी बसमध्ये सगळ्या नगरसेवकांनी घेऊन ते पोहोचले होते. जवळपास 19 नगरसेवक हे वडेट्टीवार यांच्यासोबत होते.
बैठकीत काय घडलं?
चंद्रपूर महानगरपालिकेतील जवळपास काँग्रेसचे 19 आणि 2 अपक्ष नगरसेवक दिल्लीत दाखल झाले होते. जवळपास 45 मिनिटं बैठक झाली. राजधानी दिल्लीतील 51 लोधी इस्टेट इथं ही बैठक झाली. काँग्रेस पक्षाचा महापौर होईल हे बैठकीत दोन्ही नेत्याकडून वदवून घेण्यात आले. यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेचा महापौराचा मार्ग मोकळा झाला आहे. महापौरपद हे वडेट्टीवार यांच्या गटाला मिळते का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. नगरसेवकांच्या संख्येच्या आधारावर निर्णय घेण्यात येणार आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला काय पद मिळणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या बैठकीमध्ये मार्ग काढण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांचा सल्ला घेण्यात आला होता. के सी वेणुगोपाल यांनी प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांना समोरासमोर बसून महापौराचा मुद्दा निकाली काढण्याचा निर्णय वदवून घेतला. महापौर पदासंदर्भात अजून एक महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे.
