राज्यात नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसला चांगले यश मिळाले. त्यानंतर या महानगरपालिकेत काँग्रेसचा महापौर करावा, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु वडेट्टीवार-धानोरकर यांच्यातील वादामुळे त्यावर तोडगा निघत नव्हता.
महापौरपदासाठी बहुमताची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी धानोरकरांवर
दिल्लीतील काँग्रेसमधल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला असून विजय वडेट्टीवार यांच्या गटाला महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेतेपद तर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला महापौरपद मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र महापौर पदासाठी बहुमताची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी पक्षाने धानोरकर यांच्या खांद्यावर टाकली आहे.
advertisement
दिल्लीत चंद्रपूर महापौरपदाविषयी तोडगा
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसावा यासाठी हालचालींना सुरुवात झाली आहे. पण काही घटनांमुळे निर्णय लांबणीवर पडला असून याबाबत काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक आज दिल्लीत झाली. याच बैठकीत पक्षश्रेष्ठींनी चंद्रपूर महापौरपदाविषयी तोडगा काढला.
वडेट्टीवार धानोरकर संघर्ष
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. दोन्ही नेत्यांना स्वत:च्या गटाचा महापौर आणि गटनेता हवा होता. मात्र या वादावर तोडगा म्हणून हायकमांडने विजय वडेट्टीवार यांच्या गटाला काँग्रेसचे गटनेतेपद तर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला महापौरपद देण्याचा निर्णय घेतला.
