नंदुरबारला काँग्रेसचा अभेद्य गड बनवला
नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल भागाला काँग्रेसचा अभेद्य गड बनवणारे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबई, बारडोली आणि नंतर नवापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
सरपंच ते कॅबिनेटमंत्री - थक्क करणारा प्रवास
advertisement
सुरुपसिंग नाईक यांचा जन्म १० सप्टेंबर १९३८ साली नवापूर तालुक्यातील नवागाव या आदिवासी लोकवस्तीच्या लहानशा गावात झाला. आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात सुरुपसिंग नाईकांनी 1962 मध्ये नवापूर तालुक्यातील सुकवेल ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून सुरू केली. १९६५ साली ते धुळे जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आले. १९७२ साली नवापूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. मार्च १९७७ साली प्रथमच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे तिकिट मिळाले. 1980 साली त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आणि ते लोकसभेत पोहचले.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना खासदार असताना २५ सप्टेंबर रोजी १९८० रोजी महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. प्रथमच मंत्री झाल्यावर त्यांना समाजकल्याण व आदिवासी विकास खाते देण्यात आले. तेव्हा पासून 2009 पर्यंत सातत्याने ते नवापूर मतदारसंघातून विधानसभेत पोहचले. या कालावधीत आदिवासी विकास, समाज कल्याण, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, वन व बंदरे अशा अनेक महत्त्वपूर्ण खात्यांचे मंत्रीपद त्यांनी भुषवले.
2009 मध्ये पहिल्यांदा पराभव
2009 मध्ये डॉ विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावितांनी त्यांचा पहिल्यांदा पराभव केला. मात्र या पराभवाने खचून न जाता त्यांनी जिद्दीने लढा देत 2014 मध्ये शरद गावितांनाच पराभूत करत पुन्हा विधानसभेत पोहोचले. पुढे 2019 आणि 2024 मध्ये त्यांचे चिरंजीव शिरीष नाईक काँग्रेसच्या माध्यमातून या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहे.
आपल्यातील शैक्षणिक दृष्टी जोपासात त्यांनी आपले जुने सहकारी दिवंगत माणिकराव गावित यांच्यासोबत आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून नवापूर तालुक्यात मोठ्या शिक्षण संस्थेचं जाळं विणलं. आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे याची पायाभरणी केली.
एका रात्रीत दिल्ली गाठून गार्डनमध्ये ठोकला मुक्काम
गांधी घराण्याचे अतिशय निष्ठावंत राहिलेल्या सुरुपसिंग नाईक यांच्यासाठी इंदीरा गांधी यांनी खांडबाऱ्यात सभा देखील घेतली होती. आणीबाणी नंतर नेत्यांची पळवापळव सुरू असताना लोकसभेवर निवडून आल्यानंतर रात्रीतून दिल्ली गाठून रात्रभर इंदिरा गांधींच्या गार्डनमध्ये सुरुपसिंग नाईकांनी मुक्काम ठोकला. सकाळी उठल्यानतंर इंदीरा गांधी यांना त्यांचं दर्शन झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत आपली देखील पळवापळव होण्याच्या आशंकेने आपण दिल्ली गाठल्याचं त्यांनी इंदिरा गांधींना सांगितलं. नाईकांच्या निष्ठेवर इंदिरा गांधी भलत्याच खूश झाल्या. याची चर्चा आजही नंदुरबारात रंगते. त्यांच्या निधनाने नंदुरबार धुळे जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना समाज माध्यमातून व्यक्त होताना दिसून येत आहे.
