यंदा गौरीपूजन 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या तीन दिवसांत, पहिल्या दिवशी आगमन आणि प्रतिष्ठापना केली जाते. दुसऱ्या दिवशी गौरींची पूजाकरून त्यांना नैवेद्य दाखवले जातात आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केलं जातं. ज्येष्ठा गौरी ही देवी पार्वतीचं एक रूप आहे. गौरींची पूजा केल्याने घरात समृद्धी आणि शांती नांदते, असं मानलं जातं.
advertisement
गौरीला माहेरवाशीण समजलं जातं. वर्षातून एकदा माहेरी आलेल्या गौरींच्या मानपानात आणि पूजेत कसलीही कसर ठेवली जात नाही. त्यामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये गौराईच्या आगमनाच्या तयारीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. गौरींच्या पूजेसाठी लागणारं सामान, मुखवटे, सजावटीचं साहित्य, ओवश्याची तयारी, सुपांची खरेदी, फळफळावळ, धान्याच्या राशी यांची मागणी वाढली आहे. अनेक गृहिणींनी काही दिवसांपूर्वीच खरेदी उरकून घेतली आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिस, शाडूच्या मूर्ती आणि फायबरच्या मुखवट्यांनाही यावर्षी मागणी वाढली आहे. गौरीपूजनासाठी चंद्रहारा, कोल्हापुरी साज, राणी हार यांसारख्या दागिन्यांसह साड्यांनाही मोठी मागणी आहे. गौरीच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य, पूजासाहित्य, साड्या, मुलांचे कपडे यांच्या खरेदीसाठी शनिवारी लगबग सुरू होती.
