धनंजय मुंडेंनी, कृषी सचिव ‘व्ही. राधा’ यांची फाइल गायब केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. मॅडम व्ही. राधा या कृषी सचिव असतांना, कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि गौडबंगालाच्या रिपोर्टची फाइल त्यांनी मंत्र्यांना पाठवली. मात्र ही फाइल धनंजय मुंडेंनी गायब केला आहे. सरकारी फाईलची चोरी, पुरावे दडपण्याचा हा गंभीर प्रकार असून या प्रकरणी धनंजय मुंडेंवर एफआयआर दाखल करा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी आजच्या सुनावणीत लोकायुक्ताकडे केली आहे.
advertisement
काय म्हणाल्या अंजली दमानिया आपल्या पोस्टमध्ये?
लोकायुक्त कार्यालयात आज सकाळी ११ वाजता माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कृषी घोटाळ्यावर महत्वपूर्ण सुनावणी झाली. जीव ओतून, जवळजवळ एक तास मी सगळी केस लोकायुक्तांपुढे मांडली. कृषी टेंडर घोटाळ्यात, आयएएस अधिकारी व्ही राधा यांनी एक महत्वपूर्ण अहवाल बनवला होता. तो अहवाल व्ही राधा यांनी, धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात पाठवला, आणि हाच चौकशी अहवाल गायब झाल्याचे कृषी विभागाने लेखी मान्य करून, तसे पत्र मला दिले आहे.
सरकारी फाईलची चोरी, पुरावे दडपण्याचा गंभीर प्रकार. IPC 378, 379, 409, 201, 204 व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार FIR करण्याचा पूर्ण अधिकार लोकायुक्तांना आहे आणि हा FIR त्यांनी दाखल करावा अशी लेखी मागणी मी लोकायुक्तांकडे केली. ही तक्रार माननीय लोकायुक्तांनी रेकॉर्डवर घेतली. (ही तक्रार मी जोडली आहे व ह्याच बरोबर, मी कृषी विभागाकडून असलेले पत्र देखील जोडले आहे ).
धनंजय मुंडे यांच्या वकिलांना लोकायुक्तांनी 21 ऑगस्टला आदेश दिले होते की त्यांचे म्हणणे त्यांनी लिखित स्वरूपात 2 आठवड्यात सादर करावे. पण तब्बल 5 महिने उशिराने त्यांनी ते उत्तर, आज सादर केले व नुसतीच माफी मागितली. ह्यावरून त्यांना कायद्याची भीती नाही हे स्पष्ट होते. पुढील सुनावणी 18 फेब्रुवारी ला ठेवण्यात आली आहे.
