राजीनामा दिल्यानंतर देखील धनंजय मुंडेंच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. आता एका नव्या प्रकरणामुळे मुंडेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी वस्तू खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. तीन वेगवेगळ्या वस्तूंच्या खरेदीत तब्बल ६०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता.
advertisement
या प्रकरणात आता आर्थिक गुन्हे शाखेने अंजली दमानिया यांना नोटीस पाठवली आहे. दोन दिवसांत पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवावा, असं नोटीशीत म्हटलं आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतचे सर्व पुरावे, तपास यंत्रणेसमोर सादर करावेत, असंही नोटीसीत सांगण्यात आलं आहे. त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांसह त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे.
या सगळ्या घडामोडीनंतर आता धनंजय मुंडे पुन्हा गोत्यात सापडण्याची शक्यता आहे. दमानिया यांचा जबाब नोंदवल्यानंतर, त्याआधारे धनंजय मुंडेंना देखील चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. धनंजय मुंडे आधीच वाल्मीक कराड प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे. एकूण अशी परिस्थिती असताना आता या नव्या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे.