राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे दिल्लीत सकाळी दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनात त्यांनी भेट घेतली. संसद भवनातच त्यांनी इतरही काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घडवून आणल्याचे सांगितले जाते. अमित शाह यांच्या भेटीवेळी राष्ट्रवादीचा एक मोठा नेता त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले जाते.
advertisement
धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाची चर्चा होत असताना त्यांच्या अमित शाह यांच्यासोबतीच्या भेटीने अधिकच सस्पेन्स वाढवला. मात्र आमच्या बैठकीत परळीच्या कामाविषयी चर्चा झाल्याचे धनंजय मुंडे यांनी एक्सवर पोस्ट करून सांगितले.
परळी ज्योतिर्लिंग आणि मतदारसंघातील कारखान्यासंदर्भात चर्चा
धनंजय मुंडे म्हणाले, आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास आणि कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा आणि सकारात्मक बदल घडणार आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली. तसेच पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजची ही भेट होती, असे सांगायला मुंडे विसरले नाहीत.
अमित शाह यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे खूश
धनंजय मुंडे आणि अमित शाह यांच्या भेटीबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. स्थानिक मुद्द्यांवर भेट झाल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली असली तरी अमित शाह यांच्या भेटीनंतर ते प्रचंड खूश असल्याचे तेथील उपस्थितांनी सांगितले. मात्र बीडचे खासदार सोनवणे यांनी धनंजय मुंडे मंत्री होऊ शकणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.
