नेमकी काय आहे घटना?
दिवा पूर्वेकडील बेडेकरनगर परिसरातील नथुराम शिंदे यांची पाच वर्षांची मुलगी निशा ही घराबाहेर खेळत असताना तिला एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. तिला तातडीने डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिला रेबीजचे तीन डोस देण्यात आले. मात्र, चौथ्या डोसच्या वेळी तिची प्रकृती कमालीची बिघडली. तिला रेबीजची लागण झाल्याने ती कुत्र्यासारखे आवाज काढू लागली आणि स्वतःलाच चावे घेऊ लागली. अखेर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असताना २१ डिसेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली.
advertisement
स्मशानातील तो काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग
निशाच्या मृत्यूनंतर मुंबईतच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधी आटोपल्यानंतर नातेवाईक घराकडे निघाले. नथुराम शिंदे यांनी "मी कागदपत्रे घेऊन येतो" असे सांगितले, मात्र ते परतलेच नाहीत. नातेवाईकांनी दिवा स्थानकावर आणि सर्वत्र त्यांची शोधाशोध केली, पण नथुराम कुठेच सापडले नाहीत.
दोन दिवस उलटूनही नथुराम यांचा शोध न लागल्याने नातेवाईक पुन्हा स्मशानाकडे गेले. तिथे जे दृश्य दिसले ते पाहून सर्वांचे काळजात चर्र झाले. नथुराम हे मुलीवर जिथे अंत्यसंस्कार केले होते, त्या जागेजवळ विमनस्क अवस्थेत बसून होते. आपली लाडकी निशा पुन्हा उठेल आणि आपल्याला मिठी मारेल, या आशेने ते दोन दिवस तिथेच बसून तिची वाट पाहत होते.
नातेवाइकांना फुटला टाहो
या प्रकारानंतर नातेवाईकांनी नथुराम यांना कसेबसे समजावून घरी आणले. पोटच्या गोळ्याला गमावण्याचे दुःख किती अथांग असू शकते, याची प्रचिती या घटनेने संपूर्ण परिसराला आली.
