डोंबिवलीतील रेरा प्रकरणात अडकलेल्या 65 इमारतीं संदर्भात आज मंत्रालय मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक प्रधान सचिव/अप्पर मुख्य सचिव इंजि.असीम कुमार गुप्ता यांच्या दालनात झाली.
या आधी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आश्वासन दिले होते की 65 इमारतींमधील कोणत्याही कुटुंबाला बेघर व्हावे लागणार नाही.त्याच अनुषंगाने आजच्या बैठकीत या प्रकरणात पुढील मार्गदर्शन व सूचना मांडण्यात आल्या.या बैठकीत ठाम भूमिका मांडण्यात आली की,या इमारतींमध्ये राहणारे निरपराध रहिवासी हे गुन्हेगार नाहीत.खरे गुन्हेगार म्हणजे विकासक असून कारवाई त्यांच्यावरच झाली पाहिजे. तसेच शासनाने आज मांडलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून भविष्यात या इमारतींवर कोणतीही कारवाई होऊ नये, अशी मागणी उपस्थित करण्यात आली.तसेच बैठकीतून झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे लवकरच गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी ठोस निर्णय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.त्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.
advertisement
या बैठकीस कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे साहेब, मा. नगरसेवक नितीनजी पाटील, महसूल विभागाचे अधिकारी, नगर विकास विभागाचे अधिकारी तसेच 65 इमारत बचाव समितीचे पदाधिकारी व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकरण काय?
डोंबिवलीतील समर्थ कॉम्प्लेक्स, अमर्त्य कॉम्प्लेक्स सह एकूण ६५ इमारतींना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) नुकतीच कारवाईची अंतिम नोटीस बजावली होती. यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रक्ताचं पाणी करून घेतलेलं घर अनधिकृत कसं? असा संतप्त सवाल रहिवाशांकडून केला जात आहे. या प्रकरणी रहिवाशांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून या प्रश्नांनी थेट बोट ठेवले आहे.