मत्स्यप्रेमींना अतिशय प्रिय असलेल्या मऊ, लुसलुशीत आणि चवदार कोळंबीला ट्रम्प यांच्या निर्यात धोरणाचा मोठा फटका बसलाय. भारतातून मोठ्या प्रमाणात अमेरिकेत कोळंबी निर्यात होते. याता याच निर्यातीसाठी 26 टक्के शुल्क भरावं लागणार असल्याने मच्छीमार बांधव आर्थिक संकटात सापडले आहेत. परिणामी कोळंबीचे दर थेट 80 टक्क्यांनी घसरलेत. अमेरिकेच्या या नव्या धोरणामुळे नफा तर दूरच पण उत्पादन खर्चही भरुन काढणं अवघड बनलंय.
advertisement
कोळंबीचे दर आवाक्याबाहेर
आता टॅरिफ वाढल्याने अमेरिकन ग्राहकांसाठी कोळंबीचे दर आवाक्याबाहेर जातील. वाढलेल्या दरांमुळे जर अमेरिकन नागरिकांनी कोळंबीकडे पाठ फिरवली तर भारताचं अंदाजे 1 अब्ज डॉलर्सचं नुकसान होण्याची भिती आहे. सध्या या टॅरिफमुळे कोळंबीची निर्यात ठप्प झालीये. तर कोळंबीचे दर 350 रुपयांवरुन थेट 70 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
मच्छीमारांचं टॅरिफमुळे कंबरडे मोडण्याची शक्यता
कोकणातल्या मच्छीमारांना कोळंबीमुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळून मोठा आर्थिक फायदा होतो. सध्या मत्स्य दुष्काळाचा सामना करणाऱ्या कोकणातल्या मच्छीमारांचं या नव्या टॅरिफमुळे कंबरडे मोडण्याची शक्यता आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या धोरणावर सकारात्मक विचार व्हावा अशी मागणी जोर धरतेय.
गुंतवणूकदारांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका ठेवावी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्क लादण्याच्या निर्णयाचे जगभरात विपरीत पडसाद उमटलेत. अमेरिकेनं भारतातून आयात करत असलेल्या वस्तूंवर 26 टक्के कर आकारलाय. अमेरिकेच्या या टेरिफ धोरणामुळं शेअर बाजारात घबराट पाहायला मिळाली. सामान्य गुंतवणूकदारांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका ठेवावी, घाबरुन विक्री करु नये,शेअर बाजारात परिस्थिती इतकी खराब नाही, गुंतवणूकदरांनी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी असा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञांनी दिलाय.
अमेरिकेतील जनता रस्त्यावर
अमेरिकेच्या या टेरिफ धोरणाविरोधात अमेरिकेतील जनताही रस्त्यावर उतरलीय. अमेरिकेतील 50 राज्यातील जनतेनं ट्रम्प यांच्या या धोरणाचा निषेध केला आहे. आता अमेरिकेच्या या धोरणांमुळं जगावर भविष्यात आणखी काय आर्थिक परिणाम होणार, जगावर मंदीचं सावट तर येणार ना याची चर्चा सुरू झाली आहे.
