शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेही राजधानीत मुक्कामी आहेत. ठाकरे हे आज इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. शिंदे-ठाकरे हे दोघेही एकाच दिवशी दिल्लीत आल्याने चर्चांना उधाण आले. आठवडाभरात एकनाथ शिंदे यांचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास भाजपच्या बड्या नेत्याची भेट घेतल्याची चर्चा समोर आली होती. एकनाथ शिंदे हे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेटली.
advertisement
शाह- शिंदे यांची भेट...
समोर आलेल्या माहितीनुसार, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 25 मिनिटं एकांतात चर्चा झाली. त्याआधी काही मुद्यांवर शिंदे यांनी आपल्या खासदारांसह शाह यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
त्यानंतर सायंकाळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली. या भेटीत एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. कुटुंबाशी अनौपचारिक चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महायुतीमधील खदखद बाहेर...
एकनाथ शिंदे यांनी मोदी-शाह यांच्यासोबतच्या बैठकीत महायुतीतील सुप्त संघर्षावर चर्चा केली असल्याचे वृत्त आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाचे मंत्री, आमदारांवर आरोपांचा भडिमार झाला होता. मंत्र्यांवर आरोपांचा धुरळा उडाला होता. त्यानंतर शिंदे गट काहीसा बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले. त्याशिवाय, महायुतीत शिंदे गटाला डावलले जात असल्याचे चित्र आहे. निधी वाटपातही शिंदे गटाच्या मंत्र्यांबाबत हात आखडता घेत असल्याची खदखद याआधी देखील समोर आली होती. त्याशिवाय, महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याच्या निधी वाटपावरही मु्ख्यमंत्री कार्यालयाचे नियंत्रण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीसोबत महायुतीमधील सुप्त संघर्षावरही मोदी-शाह यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचे म्हटले जात आहे.