राज्यभरातील नगर परिषदांसाठी मंगळवारी मतदान होत आहे. हिंगोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आमदार संतोष बांगर यांची वहिनी निवडणूक रिंगणात असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदानासाठी आज अगदी सकाळीच मतदान केंद्रावर गेल्यानंतर आमदार बांगर यांनी एका महिलेला मतदान कुठे आणि कसे करायचे, हे सांगितल्याची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे.
आज सकाळी हिंगोली शहरातील मंगळवार बाजार भागातील जिल्हा परिषद कन्या शाळा मतदान केंद्रावर मतदान करत असताना आमदार संतोष बांगर यांनी एका महिलेला मतदान करण्यासंदर्भात बोट दाखवून सूचना करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात मतदान गोपनीयतेचा भंग झाल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
मोबाईल मतदान केंद्रात नेण्यास बंदी, तरीही मोबाईल नेऊन शूटिंग
आमदार संतोष बांगर हे मंगळवारी सकाळी त्यांच्या भागातील बुथवर मतदान करायला गेले होते. रांगेतील महिलेला मतदान कसे करायचे हे त्यांनी बोट दाखवून सांगितले. तसेच मतदान होत असलेल्या खोलीत त्यांनी घोषणाही दिल्या. निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार मोबाईल मतदान केंद्रात नेण्यास परवानगी नाही. असे असूनही आमदार बांगर यांनी मोबाईल नेऊन चित्रिकरण केले.
