विशाल कुलकर्णी गुरुजी यांनी सांगितलं की, यावर्षी रथसप्तमी हा सण 25 जानेवारीला साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते. रथसप्तमीला माघी सप्तमी, महती सप्तमी, सप्त-सप्तमी आणि आरोग्य सप्तमी अशा विविध नावांनीही ओळखले जाते. यंदा सप्तमी तिथी 24 जानेवारीला मध्यरात्री 12 वाजून 49 मिनिटांनी सुरू होईल आणि 25 जानेवारीला रात्री 11 वाजून 10 मिनिटांपर्यंत असेल. उदय तिथी सूर्यदेवाच्या उदयावर आधारित असल्याने रथसप्तमीचा मुख्य दिवस 25 जानेवारी हाच मानला जातो, अशी माहिती गुरुजींनी दिली.
advertisement
स्नान आणि पूजा शुभ मुहूर्त
रथसप्तमीच्या दिवशी पहाटे स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी सकाळी 5 वाजून 26 मिनिटांपासून 7 वाजून 13 मिनिटांपर्यंतचा काळ स्नानासाठी शुभ मानला जातो. या वेळेत स्नान केल्यास पुण्यफळ मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच सूर्यदेवांची पूजा आणि दान करण्यासाठी सकाळी 11 वाजून 13 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंतचा काळ शुभ असल्याचं मानलं जातं. या दिवशी सूर्यदेवाची पूजा आणि दान केल्याने आरोग्य आणि यश मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. विशेष म्हणजे याच दिवशी रविवार असल्याने आणि सूर्य जयंतीही असल्याने या वर्षीची रथ सप्तमी अधिक फलदायी मानली जात आहे.





