पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून सचिन पाटील निवडणूक रिंगणात होते. मात्र या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू सूर्यवंशी यांनी दणदणीत विजय मिळवला. सचिन पाटील यांच्या पराभवामुळे गोकुळमधील एका प्रभावी घराण्याला निवडणुकीत धक्का बसल्याचे चित्र आहे.
या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे, गोकुळ दूध संघाच्या दोन माजी अध्यक्षांच्या कुटुंबांचे वेगवेगळे राजकीय भवितव्य या निवडणुकीत समोर आले आहे. एकीकडे गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांची कन्या अमृता डोंगळे यांनी विजय मिळवत जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
advertisement
दरम्यान गोकुळच्या संचलिका अंजली रेडेकर यांचे चिरंजीव अनिरुद्ध रेडेकर यांनी ‘जनसुराज्य शक्ती’कडून नुल मतदारसंघातून विजय मिळवला आहे. स्थानिक पातळीवर प्रभावी प्रचार आणि संघटनाच्या जोरावर त्यांनी ही लढत जिंकली, अशी चर्चा आहे.
याशिवाय गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील हेही निवडणुकीत विजयी झाले असून, गोकुळशी संबंधित अनेक नेत्यांनी या निवडणुकीत आपली ताकद कायम राखल्याचे चित्र दिसून आले आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत गोकुळ दूध संघाशी संबंधित नेत्यांच्या कुटुंबीयांना संमिश्र यश मिळाले आहे. काही ठिकाणी जनतेने परंपरागत नेतृत्वाला कौल दिला, तर काही मतदारसंघांत नव्या समीकरणांना संधी दिल्याचे या निकालांतून स्पष्ट झाले आहे. या निकालांमुळे गोकुळ दूध संघाच्या अंतर्गत राजकारणावर आणि आगामी सहकार क्षेत्रातील सत्तासमीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून, पुढील काळात सहकार आणि स्थानिक राजकारणातील हालचालींना वेग येणार आहे.
